देशमुख महाविद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
स्पर्धेतील वैयक्तिक गटात शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथील गायत्री क्षीरसागर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक अमोल पाटील (कबचौ उमवि, जळगाव), तृतीय क्रमांक ऐश्वर्या पाटील (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) यांना प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिके चेतन भदाणे (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) व प्रिया पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे) यांनी मिळवली.
विविध महाविद्यालयांतील ३३ स्पर्धकांनी प्रभावी मांडणी व ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळावे व वैचारिक देवाणघेवाण घडावी हा अशा स्पर्धांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन डॉ. आशुतोष पाटील यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. सी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिनेश तांदळे यांनी केले.
समारोप व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ होते. व्ही. टी. जोशी, मा. खलील देशमुख, मा. विनय जकातदार, सतीश चौधरी तसेच परीक्षक सुनील पाटील, सुनंदाताई जकातदार व डॉ. विजय पालवे उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात संजय वाघ यांनी विद्यार्थी जीवनातील वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



