⁠हॅलो शेतकरी

भडगाव शेत शिवारात रंगली शेतकऱ्यांची कार्यशाळा.

भडगाव प्रतिनिधी (यशकुमार पाटील)

भडगाव : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने भडगाव शिवारात मका पिकावरील शेतशाळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या शेतशाळेत शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

कृषी विभागामार्फत कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत आयोजित या शेतशाळेत मका पिकाच्या विविध टप्प्यांवर आवश्यक काळजी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी अवलंबावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी काजल भाऊसाहेब ढोकळे (भडगाव) यांनी कार्यक्रमाचे आयोजन, सुयोग्य नियोजन सुत्रसंचलन केले.

कृषी अधिकारी सुकदेव गिरी यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे बीजप्रक्रिया कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. बीजप्रक्रियेमुळे उगवण क्षमता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि उत्पादन खर्चात बचत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी अधिकाऱ्यांच्या कवितांनी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. उपकृषी अधिकारी एम. जे. वाघ (भडगाव मंडळ) यांनी शासकीय योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी रेखा बनसोडे (गिरड) यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन महिलांना शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकारी ललित देवरे यांनी शेतकऱ्यांसमोर कवितेच्या माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिला.

या शेतशाळेत महिलांनी मका पिकाची प्रत्यक्ष पाहणी करत पिकातील वाढ, पानांची स्थिती, किडींची लक्षणे यांचे निरीक्षण केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध उदाहरणे देत हलक्याफुलक्या भाषेत मार्गदर्शन केल्याने महिलांमध्येही शेतीविषयक जनजागृती वाढली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीनाताई बाग यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अजयकुमार साळुंखे, शुभम बंगाळे, सिध्देश्वर सावंत, सौरभ दुगड यांनीही मोलाचे योगदान दिले.

या शेतशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, शासकीय योजना व मका पिकाच्या योग्य व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे ज्ञान वाढून शेती अधिक शाश्वत व फायदेशीर ठरेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button