हॅलो राजकारण

Maharashtra loksabha: ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

हॅलो जनता (मुंबई) : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Maharashtra loksabha) प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका जाहीर केली. विरोधकांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपाच्या गोटातही उमेदवार ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. अखेर आज उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. निकम यांच्या नावाच्या घोषणेमुळे पूनम महाजन की आशिष शेलार? यापैकी कोण? ही चर्चाही संपुष्टात आली आहे.

Maharashtra loksabha : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्वल निकम नेमकं काय म्हणाले…

“भाजपाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा आभारी आहे. मला कल्पना आहे की, राजकारण माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. पण माझे प्रामाणिक प्रयत्न असतील की, जे देशद्रोही तत्त्व आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन. भाजपाने जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्याचा मी ताकदीनिशी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम हॅलो जनता वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Maharashtra loksabha : उज्वल निकम यांच्या परिवाराला राजकीय वारसा….

उज्ज्वल निकम हे मराठी वकील आहेत. सरकारी वकील म्हणून यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. उज्वल निकम यांच्या परिवाराला राजकीय वारसा असून उज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम यांचे सहकार क्षेत्रात भरीव काम आहे. त्यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून १९६७ मध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Loksabha: बहिणाबाईंचा आशीर्वाद घेत जळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा स्मिता वाघ यांचा निर्धार, जुन्या जळगावातील वाड्याला दिली भेट

MVA Jalgaon : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button