हॅलो सामाजिक⁠हॅलो संवाद

तुमची डिजिटल फसवणूक झाली आहे का? लगेच ही बातमी वाचा…

हॅलो जनता, पाचोरा – “सायबर क्राईम हा भारतातील एक ज्वलंत प्रश्न आहे. दररोज लाखो लोकांची फसवणूक याद्वारे होत आहे. इंटरनेट द्वारे होणाऱ्या फसवणुकीचे गुन्हे जेवढे जास्त, तेवढेच आधार कार्डचा स्वैर वापर करणे सुद्धा आता धोकादायक आहे. फसवणूक झाल्याबरोबर 1930 या नंबरला अर्ध्या तासाच्या आत कॉल करणे हा सायबर फसवणुकीवरील सर्वात प्रभावी प्रथमोपचार आहे” असे प्रतिपादन सायबर सेक्युरिटी तज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी पाचोरा येथे व्यक्त केले.

येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव, जैन पाठशाळा पाचोरा यांच्यातर्फे आणि पाचोरा पोलीस ठाणे, पाचोरा यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 29 जून रोजी सकाळी 10 वाजता, जैन पाठशाळा सभागृह पाचोरा येथे सायबर क्राईम या विषयावर जनजागृती पर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ संघवी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम, डॉ. मुकेश तेली व्यासपीठावर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागत सत्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. रोटरीचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी जनतेला उद्बोधन करताना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनीही आपल्या मनोगतात रोटरीचे सेवाभावी कार्य आणि या कार्यक्रमाचे प्रयोजन उपस्थितांसमोर मांडले.

सुमारे दोन तासाच्या आपल्या मनोगतात डॉ. धनंजय देशपांडे यांनी सायबर गुन्हेगारांच्या विविध पद्धती व त्यातून स्वतःच्या बचावाचा मार्ग श्रोत्यांना समजावून सांगितला. मोठमोठ्या शहरातून अंत्यसंस्कार सेवा पुरवणाऱ्या ऑनलाइन लिंक, डिजिटल अरेस्ट ची फसवी कार्यपद्धत, भावनिक आणि आर्थिक पद्धतीने होणारी सायबर फसवणूक, बाहेरगावी शिकणाऱ्या मुला मुलींच्या पालकांना भावनिक साद घालून केली जाणारी फसवणूक, नजरचुकीने तुमच्या अकाउंटला जमा झालेले पैसे परत पाठवा अशा विनंतीतून होणारी फसवणूक, हनी ट्रॅप च्या माध्यमातून तरुण व पन्नाशीतील पुरुषांची होणाऱ्या फसवणुकीची पद्धत, एटीएम वापरत असताना घ्यावयाची काळजी, प्रदेशातून आलेले पार्सल किंवा फॉरेन करन्सी चा धाक दाखवत होणारी फसवणूक, घर बंद असल्याने तुमचे पार्सल परत गेले म्हणून तुमच्या दारावर चिटकवलेल्या स्कॅनरला स्कॅन केल्यास पार्सल परत मिळेल असा मेसेज करून होणारी फसवणूक, सरकारी कर्मचारी भरतीची खोटी जाहिरात, किंवा शासकीय कार्यालयांची बोगस लिंक याद्वारे होणारी फसवणूक वगैरे शेकडो उदाहरण देऊन डॉ. देशपांडे यांनी जनतेचे प्रबोधन केले.

या सर्व फसवणुकीपासून वाचताना घ्यावयाची काळजी व उपाय सुद्धा डॉ. देशपांडे यांनी उपस्थितांसमोर मांडले. त्यात विशेषतः खाजगी नातेवाईक व परिवाराकरता एक वेगळा आणि आर्थिक व्यवहार व व्यवसाय करीता स्वतंत्र मोबाईल व ईमेल आय.डी. वापरणे, ओळखपत्र म्हणून सर्रास आधार कार्ड देण्याचे टाळणे, पर्यटन व सुट्टीच्या कालावधी मौजमजेला जाताना स्वतःचे स्टेटस ठेवणे किंवा बाहेरगावी असतानाचे फोटो व्हायरल करण्याचे टाळावे, मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही लिंक्स ला घाई गर्दीत क्लिक करणे टाळावे, वगैरे सूचना व मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : जळगाव शहारत तब्बल १०७ धोकादायक इमारती, मनपातर्फे नोटीस

💥 ब्रेकींग – त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आताच ई-पीक पाहणी नोंदणी करा अन्यथा….

व्याख्यानानंतर सुमारे एक तास श्रोत्यांच्या प्रश्नांना डॉ. धनंजय देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या कार्यक्रमाला पाचोरा शहरातील नागरिक, युवक, युवती, महिला, तसेच पाचोरा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. डॉ. मुकेश तेली यांनी आभार प्रकटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button