आई – बाप उमगले… अश्रूंचे बांध फुटले !
हंकारेचा भावनिक संवाद : शाब्दिक हुंकाराने अंतर्मनात पेटली माणुसकीची ठिणगी
हॅल्लो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील
भडगाव : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वावटळात आई -बापालाच बाजूला सारलेल्या मुला मुलींना आज आई-बाप अन् त्यांच्या कष्टाची जाणीव झाली. भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “माझी मुलगी माझा अभिमान” या कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांचे प्रभावी व्याख्यान झाले.
मुलींचे शिक्षण, आत्मसन्मान, सुरक्षितता आणि पालकांची भूमिका यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. “मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंबाचा अभिमान आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या संवादातून बाहेर पडलेल्या भावनिक हुंकाराने मुलांसह उपस्थित सर्वांनाच आई-बाप उमगले अन् आपोआप अश्रूंचे बांध फुटू लागले. त्यांचा प्रत्येक शब्द उपस्थितांच्या काळजाला भिडला आणि त्यांच्या अंतर्मनात माणुसकीच्या ठिणगीने पेट घेतला.
मुला मुलींना यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी आई बापाचे योगदान, त्याग, कष्ट, संघर्ष उलगडतांना प्रत्येकालाच आई-बाप उमगले आई -बापाविषयी हंकारे यांच्या भावनिक सादाने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व उपस्थित मान्यवरांचा अंतर्मनाचा ठाव घेत घेतला व्याख्यानाची अखेरही भावनावश क्षणानेच झाली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बापाला घट्ट मिठी मारण्याच्या आव्हान हंकारे यांनी मुलींना केले. या मिठीतून मुलीच्या अश्रूंनी बापाचा भिजलेला खांदा पाहून उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले.
यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कंरकार, तसेच महिला दामिनी संघाचे योजनाताई पाटील, मीनाताई बाग, नूतनताई पाटील, अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे चेतन पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, भडगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, कन्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे, पो. कॉ. प्रवीण परदेशी, पो. कॉ. सुनील राजपूत, पो. कॉ. गोवर्धन बोरसे, पो. कॉ. भूषण पाटील, पो.कॉ. निलेश ब्राह्मणे यांसह विद्यार्थी विद्यार्थिनी ,शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




