भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
भडगाव : महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ज्वेलरी डिझाईन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उघडणारी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे पत्रकार निलेश बापूराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
कार्यशाळेत मेकॅनिकल इंजिनिअर (नाशिक) श्रीमती कृणाली दिनेश देशमुख यांनी ज्वेलरी डिझाईन व्यवसायातील भविष्यातील संधी, आवश्यक कच्चा माल, बाजारपेठेची माहिती देत प्रत्यक्ष डिझाईन प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थिनी शालेय वयातच कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या प्रयोगाच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. बी. बी. भोसले (जिल्हा सरचिटणीस), भरत चव्हाण (जिल्हा संपर्कप्रमुख), यशकुमार पाटील (तालुका सचिव), प्राथमिक शिक्षिका श्रीमती मंजुषा गणेश देशमुख, मुख्याध्यापक सुरेश रोकडे, पर्यवेक्षक शामकांत पंडितराव बोरसे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर. जाधव यांनी केले, तर पी. ओ. महाजन यांनी आभार मानले.