भडगाव तहसीलसमोर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण; १५ व्या वित्त आयोगातील कामांची चौकशीची मागणी.
ग्रामस्थांच्या मते, संबंधित कालावधीत
ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. बेकायदेशीर शिपाई भरती, हौद दुरुस्ती, भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम, भूमिगत गटारी बांधणी, शाळा दुरुस्ती व शौचालय कामे, अंगणवाडी डिजिटल करणे व साहित्य खरेदी, घनकचरा दूत नियुक्ती तसेच आय.डी.बी.आय. बँकेच्या खात्यातील एस.आर. फंडातून खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य संघटना तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पृथ्वीराज राठोड, देविदास राठोड, पंढरीनाथ चव्हाण, शिवदास राठोड, नवल राठोड, रघुनाथ राठोड, भगवान शिंदे, सुभाष अहिरे, गोकुळ संसारे, रवींद्र सोनवणे, सुधीर अहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकशी अधिकाऱ्यावर हलगर्जीपणाचा आरोप
यापूर्वी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले विस्तार अधिकारी अशोक दामू खैरनार यांनी प्रत्यक्ष चौकशी न करता अहवाल सादर केला असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. त्यामुळे स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
अतिरिक्त गटविकास अधिकारी, पंचायत समिती भडगाव सुशील सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. विस्तार अधिकारी (कृषी) यांच्या माध्यमातून नव्याने चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत वडगाव नालबंदी येथे प्रत्यक्ष दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
सरपंचांचा आरोप फेटाळला
दरम्यान, वडगाव नालबंदीच्या सरपंच लिलाबाई मोरसिंग राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, २०२१ ते २०२५ या कार्यकाळातील १५ व्या वित्त आयोगातील सर्व कामे मंजूर इस्टीमेट प्रमाणे पूर्ण झाल्याचा दावा केला. संबंधित कामांचे ऑडिट देखील झाले असून काही जणांकडून जुनी कामे दाखवून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
१६ मार्च रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, या अहवालातून सत्य समोर येणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.