भडगाव : ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची २४ तासांपासून रांग; शेतकऱ्याला आली भोवळ.

भडगाव प्रतिनिधी यशकुमार पाटील
भडगाव तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी ज्वारी विक्रीसाठी शेतकी संघाच्या कार्यालयात आले होते. मात्र टोकन वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. ऑनलाइन नोंदणी करून ज्वारी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून टोकन घ्यावे लागत असल्याने सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या.
भर उन्हात उभे राहून तासन्तास वाट पाहावी लागत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले. अनेक शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान, उष्म्यामुळे आणि थकव्यामुळे एका शेतकऱ्याला चक्कर येऊन तो खाली कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.
गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी पसरली. “आम्ही आमचेच धान्य विकण्यासाठी इतका त्रास सहन करतो आहोत, प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर अशी वेळ आली नसती,” अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणात शेतकी संघाकडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन न झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. टोकन वितरण, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि गर्दी व्यवस्थापन याबाबत नियोजनाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासन आणि शेतकी संघाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने धान्य विक्री करता यावी यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.
पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…



