हॅलो शिक्षण

देशमुख महाविद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील

भडगाव : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे “स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. मूळजी जेठा महाविद्यालय, जळगावच्या संघाने यंदाचा स्मृतिकरंडक पटकावत मानाचा तुरा रोवला.

स्पर्धेतील वैयक्तिक गटात शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथील गायत्री क्षीरसागर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक अमोल पाटील (कबचौ उमवि, जळगाव), तृतीय क्रमांक ऐश्वर्या पाटील (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) यांना प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिके चेतन भदाणे (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) व प्रिया पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे) यांनी मिळवली.

स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. विनय जकातदार, खलील देशमुख, डॉ. विजयकुमार देशमुख, रमेशजी जकातदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

विविध महाविद्यालयांतील ३३ स्पर्धकांनी प्रभावी मांडणी व ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळावे व वैचारिक देवाणघेवाण घडावी हा अशा स्पर्धांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन डॉ. आशुतोष पाटील यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. अतुल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. सी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दिनेश तांदळे यांनी केले.

समारोप व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ होते. व्ही. टी. जोशी, मा. खलील देशमुख, मा. विनय जकातदार, सतीश चौधरी तसेच परीक्षक सुनील पाटील, सुनंदाताई जकातदार व डॉ. विजय पालवे उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात संजय वाघ यांनी विद्यार्थी जीवनातील वक्तृत्व स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button