हॅलो शिक्षण

देशमुख महाविद्यालयात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यान

भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचे प्रथम कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते.

डॉ. पंजाबराव देशमुख हे आधुनिक भगीरथ – डॉ. विनोद कोकणे

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी, शिक्षण, कायदा, समाजसुधारणा, धर्मसुधारणा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. गोरगरीब बहुजन शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवली. या अर्थाने ते आधुनिक भगीरथ ठरतात. त्यांनी जाती निर्मूलनासाठी स्वतः जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह केला, अमरावती येथील अंबादेवी देवस्थान दलितांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन केले. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून तरतूद केली. असे प्रतिपादन ‘डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य’ या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विनोद कोकणे (दर्यापूर, जि. अमरावती) यांनी केले.

 

जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती येथील प्राचार्य प्रा.डॉ. अतुल बोडखे यांनी प्रास्ताविकातून डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे विविध क्षेत्रातील लक्षणीय कार्य महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवे, या उद्देशाने त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रभर १२५ व्याख्याने आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, परंतु महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ४५० हून अधिक व्याख्याने आयोजित करण्यात आली, असे सांगितले. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगावचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश बुरंगे (अर्थशास्त्र विभागप्रमुख, दर्यापूर) यांनी केले.

 

याप्रसंगी मंचावर कृषीतज्ञ ॲड. विश्वासराव भोसले, सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरुण पाटील तसेच नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, पाचोरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, विनायकराव देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल पवार, डी. डी. पाटील, माजी उपप्राचार्य एस. आर. पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button