आदिवासी मुलांचे भविष्य अंधारात ; शाळा बनली गोठा

हॅलो जनता प्रतिनिधी
राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना, या शाळेकडे मात्र प्रशासनाने पूर्णतः पाठ फिरवल्याचे दिसून येते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेली ही शाळा आज गैरवापराचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
महिंदळे (काळीची वस्ती) येथील शाळेत वर्गखोलीत गुरांचे साहित्य, किचन रूममध्ये चारा ; कागदोपत्री १२ तर प्रत्यक्षात ४ विद्यार्थी हजर
शाळेची पटसंख्या कागदोपत्री १२ दाखवण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात केवळ ४ विद्यार्थी उपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठे आणि कसे सुरू आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या शाळेची आजपर्यंत गटशिक्षणाधिकारी किंवा केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी अथवा चौकशी केली नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून शाळेत वीज, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, क्रीडा मैदान, शाळा दुरुस्ती तसेच विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा पूर्णपणे अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी जणू खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक पवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला.
मात्र मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी या दोघांकडूनही परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसून आले. तथापि, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची चौकशी करून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकारामुळे भडगाव तालुक्यातील सुज्ञ नागरिक, शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासन आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देणार की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




