अवैध गौणखनिज वाहतुकीला लगाम.

वाक गावाजवळ महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई : डम्पर जप्त
भडगाव : तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत मध्यरात्री धडक कारवाई केली. मौजे वाक, ता. भडगाव परिसरात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करणारा एक डम्पर महसूल पथकाने जप्त केला आहे.
नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पथकात ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रविण पवार, संजय सोनवणे, गितेश महाजन, योगेश पाटील, लोकेश महाजन, ग्राम महसूल सेवक नितीन मोरे, समाधान माळी तसेच पोलीस हवालदार लहू कोळी यांचा समावेश होता.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने तत्काळ हालचाली करत संशयित वाहन अडवले. तपासणीदरम्यान वाहनचालकाकडे कोणतेही वैध दस्तऐवज सादर न झाल्याने संबंधित डम्पर तहसील कार्यालयात जप्त करून जमा करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे भडगाव तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. महसूल विभागाकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर व धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अवैध उत्खनन किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




