जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुरामुळे बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन
आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क
हॅलो जनता, प्रतिनिधी – वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या.
वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्तहानी झालेली आहे. बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणेत येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहे.
तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
शेतकऱ्यासाठी बैलच ठरला ‘काळ’, पोळ्याची तयारी करताना बैल उधळला